भोपाळ : ग्वालियर जिल्ह्यातल्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात पाच दिवसांपूर्वी नथुराम गोडसेचा पुतळा बसवला होता. पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये हा पुतळा जप्त केला आहे. प्रशासनानं गोडसेचा पुचळा बसवल्याप्रकरणी हिंदू महासभेला पाच दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. या नोटिसला उत्तर न दिल्यामुळे पोलिसांनी पुतळा जप्त केला. तसंच हिंदू महासभेचं कार्यालयही सील करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू महासभेचे कार्यकर्ते नथुरामच्या पुतळ्याची रोज पूजाही करत होते. १५ नोव्हेंबरला हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात विधी आणि पूजा करून नथुराम गोडसेच्या पुतळ्याची स्थापना केली. हिंदू महासभेनं याला नथुराम गोडसेचं मंदीर घोषीत केलं आणि रोज पूजा तसंच प्रत्येक मंगळवारी आरती करण्याचीही घोषणा केली.


नथुराम गोडसेचा पुतळा स्थापन केल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनं भोपाळपासून ग्वालियरपर्यंत याचा विरोध केला. तसंच अनेक ठिकाणी निदर्शनंही करण्यात आली. यानंतर अखेर गोडसेचा पुतळा पोलिसांनी हटवला. महात्मा गांधींची हत्या केल्याप्रकरणी नथुराम गोडसेला १५ नोव्हेंबर १९४९ला फाशी देण्यात आली.