उत्तर प्रदेशातील बागपत येथे गेल्या आठवड्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. मृत तरुणीची नंतर ओळखही पटली होती. नोएडामधील सैदपूर गावात राहणाऱ्या मनिषाचा हा मृतदेह होता. मनिषाची हत्या तिचाच भाऊ आणि वहिणीने मिळून केली होती. या गुन्ह्यात वहिनीला तिच्या प्रियकरानेही साथ दिली. पोलिसांनी मनिषाचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे. वहिनीने प्रियकरासोबतचे संबंध आणि करोडोंची संपत्ती हडपण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचं उघड झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोतवाली बागपत क्षेत्रात ही घटना घडली आहे. येथे चार दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यानंतर त्यांनी तपास सुरु केला. तपासात हा मृतदेह नोएडामधील मनिषाचा असल्याचं उघड झालं. ती सैदपूर गावाचे माजी प्रधान चरण सिंग यांची नात होती. 


यानंतर पोलिसांना गुन्हा उलगडण्यास जास्त वेळ लागला नाही. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली मनिषाचा भाऊ, वहिनी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. प्रियकर सध्या फरार आहे, पण पोलिसांनी भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे.


हत्येचं कारण काय?


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मनिषाची हत्या तिचा भाऊ मनिष, पत्नी शिखा आणि शिखाचा प्रियकर प्रेमी पवन यांनी मिळून केली. शिखा आणि पवन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मनिषाला त्यांच्या या नात्याची माहिती मिळाली होती. तिने या नात्याला विरोध केला. शिखा ऐकत नसल्याने मनिषाने आपल्या भावाला सगळा प्रकार सांगितला. यानंतर शिखाने मनिषाचाच काटा काढण्याची योजना आखली. 


मनिषा आणि तिचा भाऊ मनिष दोघेही संपत्तीचे समान वारसदार होते. पण मनिषला आपल्या बहिणीला संपत्ती द्यायची नव्हती. यामुळेच शिखाने मनिषला त्याच्या बहिणीविरोधात भडकवलं आणि अनेक खोटे आरोप केले. यानंतर मनिष बहिणीची हत्या करण्यास तयार झाला. शिखाने यामध्ये आपल्या प्रियकरालाही सहभागी करुन घेतलं. 


संधी साधत तिघांनी गळा दाबून मनिषाची हत्या केली. यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरुन बागपतच्या सिसाना गावात आणला. तिथे एका निर्जनस्थळी त्यांनी मृतदेहाला आग लावली. सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. 


पोलिसांनी तपास सुरु केला असता घटनास्थळी एक संशयित कार दिसल्याचं उघड झालं. सीसीटीव्हीच्या आधारे कारचा शोध घेण्यात आला असता गुन्ह्याचा उलगडा झाला.