Dantewada naxal attack: पोलिसांनी भीमा मंडावी यांना सावध केले होते, पण....
मंडावी यांनी पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले.
छत्तीसगढ: दंतेवाडा परिसरात मंगळवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला. भीमा मंडावी यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. यावेळी स्फोटात भीमा मंडावी यांच्या गाडीसोबत पोलिसांच्या गाडीलाही लक्ष्य करण्यात आले. यामध्ये गाडीतील चार जवान मृत्यूमुखी पडले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली होती. मात्र, तरीही नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून ताफ्यातील गाडी उडवल्याने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भीमा मंडावी यांना इशारा दिला होते, असे स्पष्ट केले. बचेलीमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी कुआकोंडा मार्गावर पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याची कल्पना मंडावी यांना दिली होती. त्यामुळे या भागात जाऊ नये, असे बजावण्यातही आले होते. मात्र, मंडावी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. स्फोट झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी जवळपास अर्धा तास गोळीबार सुरु होता, अशी माहिती नक्षलविरोधी कारवायांचे पोलीस अधिक्षक डी.एम. अवस्थी यांनी दिली.
दंतेवाडा मतदारसंघातून निवडून आलेले भीमा मंडावी बस्तर परिसरातील १२ विधानसभा मतदारसंघापैकी भाजपचे एकमेव आमदार होते. नक्षलवाद्यांनी कट आखून हा स्फोट घडवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव दु:ख व्यक्त केले आहे. भीमा मंडावी भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. ते खूप शूर आणि हिंमतवान होते. छत्तीसगढमधील जनतेच्या मदतीसाठी ते तत्पर असायचे. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे, असे मोदी यांनी सांगितले. दंतेवाडा परिसर हा बस्तर लोकसभा क्षेत्रात येतो. येत्या ११ तारखेला पहिल्या टप्प्यात याठिकाणी मतदान पार पडेल.