Chandrayaan 3: भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीमेकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष आहे. चांद्रयान-3 सध्या यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने प्रवास करत असून, अवकाशात उड्डाण करत असताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे. पोलंडमधील ROTUZ (Panoptes-4) दुर्बिणीद्वारे अवकाशात उडताना चांद्रयान-3 दिसलं आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून, तो पाहिल्यानंतर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयान-3 ला दुर्बिणीतून पाहताना कॅमेऱ्यातही कैद केलं आहे. व्हिडीओत चांद्रयान-3 अंतराळात उडताना दिसत आहे. व्हिडीओत अंतराळ दिसत असून त्यामध्ये चांद्रयान एका लहान बिंदूप्रमाणे दाखवण्यात आलं आहे. भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा यामुळे अधोरेखित होत आहे. 



चांद्रयान-3 चा अंतराळातील प्रवास सध्या सुरु आहे. चांद्रयान 25 ऑगस्टला चंद्रावर लँडिंग करणार आहे. दरम्यान, चंद्रापर्यंतच्या प्रवासाकडे इस्रोचं लक्ष असून या प्रवासांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी ROTUZ दुर्बिणीतील निरीक्षणे महत्त्वपूर्ण ठरत आहे.


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पुष्टी केली आहे की, अंतराळ यानाने पाचवी कक्षा वाढवण्याचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. ट्रान्स लुनर इंजेक्शन आता १ ऑगस्टला होणार आहे.


4 जुलैला चांद्रयान-3 चं सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आलं. चांद्रयान-3 सध्या पृथ्वीभोवती 1,27,609 किमी x 236 किमी कक्षेत आहे. अंतराळयानाने (Spacecraft) त्याच्या कक्षा यशस्वीपणे वाढवल्या आहेत. अंतराळयानाचा वेग आता वाढवला जात असून, चंद्रावर प्रवेश करण्यासाठी त्याला स्थान दिलं जात आहे. 


इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्टला चांद्रयान-3 तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्याची शक्यता आहे. लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात उतरवण्याचं ध्येय आहे. या क्षेत्रात फार संशोधन झालेलं नसून, येथे संभाव्यत: वैज्ञानिक डेटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल अशी आशा आहे. 


चांद्रयान-3 मोहिम इस्रो आणि जागतिक वैज्ञानिक समूहासाठी फार महत्त्वाची आहे. चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी SHAPE (Spectro-polarimetry of HAbitable Planet Earth) नावाचा पेलोड समाविष्ट आहे. चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याची क्षमताही तपासली जाणार आहे. जेणेकरुन चंद्रावरील माती आणि वातावरण समजून घेण्यास मदत होईल हेदेखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.


भारताच्या चंद्रमोहिमेकडे जग श्वास रोखून पाहत आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरेल. हे मिशन ISRO च्या भविष्यातील इंटरप्लॅनेटरी मिशन्स आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ एजन्सीसह संभाव्य सहकार्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून काम करत आहे.