पाटणा : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. लोक जनशक्ती पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. पशुपती कुमार पारस सर्वसहमतीने लोकसभेत एलजेपीचे संसदीय नेता म्हणून निवडले गेले आहेत. LJP च्या ६ पैकी ५ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून वेगळ्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी ३ वाजता सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पशुपती कुमार पारस यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, मी पक्ष तोडत नाहीये. तर पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. चिराग पासवानबाबत मला कोणतीही तक्रार नाही. ते पक्षात राहू शकतात. याआधी नाराज  पशुपती कुमार पारस यांना भेटण्यासाठी चिराग पासवान हे त्यांच्या घरी गेले होते. पण त्यांची भेट होऊ शकली नाही.


'लोक जनशक्ती पक्ष हा विखुरला जात आहे. काही असामाजिक तत्व आमच्या पक्षात फूट टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ९९ टक्के कार्यकर्त्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करुन युती तोडली.' असं पशुपती पारस यांनी म्हटलं आहे. खासदारांना वाटतं की, पक्षाचं अस्तित्व धोक्यात आहे. त्यामुळे ५ खासदारांनी बंड पुकारला आहे. ज्यामध्ये पशुपती पारस, प्रिंस पासवान, वीणा सिंह, चंदन कुमार आणि महबूब अली कैसर यांचा समावेश आहे. हे खासदार जेडीयूमध्ये प्रवेश करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे लोकसभेत चिराग पासवान एकटे पडणार आहेत.


पाच खासदारांनी पशुपती कुमार पारस यांची संसदेतील नेते म्हणून निवड केली आहे. ते बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात.  सूत्रांच्या माहितीनुसार, 'एलजेपीचे खासदार रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले. त्यांनी एक पत्र दिलं. पण ओम बिर्ला यांनी पशुपती कुमार पारस यांना लोकसभेत एलजेपीचे नवे नेते म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे.' 


पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, चिराग पासवान यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग यांच्या कामामुळे काही नेते नाराज होते. लोकसभेत LJP चे ६ खासदार आहेत. एलजेपी केंद्रात एनडीएचा घटकपक्ष आहे. पण बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेडीयूच्या विरुद्ध निवडणुका लढवल्या होत्या. ज्याचा फटका नितीश कुमार यांच्या पक्षाला बसला होता.