मोदींनी उद्घाटन केलेल्या एक्सप्रेसवेवर पडला मोठा खड्डा, अखिलेश यांचा भाजपवर हल्लाबोल, योगींच्या मंत्र्याने दिले उत्तर !
Bundelkhand Expressway News : पंतप्रधान मोदी यांनी 16 जुलै रोजी जालौनच्या कथेरी गावातून बुंदेलखंड एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. त्यानंतर हा एक्सप्रेसवे जनतेसाठी खुला करण्यात आला.
लखनऊ : Bundelkhand Expressway News : उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात बुंदेलखंड एक्सप्रेसवेवर मुसळधार पावसामुळे मोठा खड्डा पडला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करण्यात आले होते. 296 किलोमीटर लांबीच्या आणि नव्याने बांधण्यात आलेल्या एक्स्प्रेस वेवर खड्डे पडल्यानंतर समाजवादी पक्षाने केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
अखिलेश यांनी हल्लाबोल केला
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करुन म्हटलेय, भाजपच्या अर्धवट विकासाच्या गुणवत्तेचा हा नमुना आहे, दुसरीकडे बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन मोठ्या लोकांच्या हस्ते झाले की, अवघ्या आठवडाभरात भ्रष्टाचाराची हे मोठे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, यावर धावपट्टी बांधली गेली नाही हे चांगले आहे. अखिलेश यांनी एक्सप्रेस वेचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
योगी यांच्या मंत्र्याकडून प्रत्युत्तर
आता योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री नंद गोपाल नंदी यांनी अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करुन लिहिले, 'अखिलेश जी, मी ऐकले आहे की तुम्ही ऑस्ट्रेलियातून अभ्यास करुन परतला आहात. तुम्ही स्वतःला गूगल मॅपचे मोठे ज्ञान सांगता ही वेगळी बाब आहे. पण राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेनुसार थोडं लिहावं आणि मग वाचावं आणि पोस्ट करावं. आपल्याकडे किमान मूलभूत तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
नंदी पुढे म्हणाले, स्ट्रेट-एज आणि प्रोफिलोमीटरच्या साह्याने पृष्ठभागाची असमानता तपासण्यासाठी आणि जेथे असमानता आहे ती दूर करण्यासाठी, आयताकृती भागात पूर्वी वापरलेले साहित्य विनिर्देशानुसार काढून पुन्हा पृष्ठभागाच्या थराचे काम केले जात आहे. माझा तुम्हाला सल्ला आहे की तुमच्या अल्पशा ज्ञानी सल्लागारांच्या अपूर्ण ज्ञानावर विसंबून राजकारण करु नका.
भाजप खासदार वरुण गांधी यांनी बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकारी आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. गांधींनी ट्विटमध्ये लिहिले की, '15 हजार कोटी रुपये खर्चून बनवलेला एक्स्प्रेस वे जर 5 दिवसांचा पाऊसही सहन करु शकत नसेल, तर त्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. या प्रकल्पाचे प्रमुख, संबंधित अभियंता आणि जबाबदार कंपन्यांना तातडीने बोलावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीचे (UPEDA) प्रवक्ते दुर्गेश उपाध्याय म्हणाले, "मुसळधार पावसामुळे बुंदेलखंड एक्सप्रेसवेला पूर आला होता, त्यामुळे बुधवारी रात्री सुमारे दीड फूट रस्ता पाण्याखाली गेला होता. माहिती मिळताच अधिकाऱ्यांचे पथक तत्काळ तेथे पोहोचले आणि त्यात सुधारणा करण्यात आली. रस्ता तातडीने दुरुस्त करुन वाहतुकीसाठी खुला केल्याचे त्यांनी सांगितले.