NCP Working Presidents : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात दोन नवे कार्यकारी अध्यक्ष जाहीर केले आहेत. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे भविष्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच अजित पवार यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी शरद पवार यांनी सोपवलेली नाही. पवारांनी नेमकी रणनिती काय आहे? या सर्व चर्चांवर शरद पवार यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत भाष्य केले. 


अध्यक्षपदाची जागा अजून रिक्त झालेली नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी कोणाच्याही नावाचा विचार केलेला नाही. अध्यक्ष पद अजून रिक्त झालेला नाही. अध्यक्ष पद रिक्त झाल्यावर त्याविषयीचा निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक सहकाऱ्याकडे पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. असं म्हणत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे भविष्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष होतील याच चर्चेला पूर्ण विराम दिला


पक्षात कुणी नाराज नाही, अजित पवार यांचे नाव घेत शरद पवार यांचा दावा


पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगलेय.  अजित पवार नाराज असल्याबाबतच्या वृत्तात तथ्य नसल्याचा दावा पवार यांनी केला आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच नवीन पदाची घोषणा करण्यात आल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. 


पक्ष संघटना मजबूत करणार


सुप्रिया सुळे लोकसभेत राष्ट्रवादी पक्षाची बाजू मांडतील. यासोबतच त्यांच्यावर महाराष्ट्र, पंजाब, हरियाणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांशी समन्वय साधणार. ज्याठिकाणी जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी इतर पक्षाशी चर्चा करणार आहे. 23 जून रोजी पाटण्यात त्यासाठी समविचारी पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.


भाकरी फिरवली


राजकारणातील चाणक्य अशी शरद पवार यांची ओळख. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा करत शरद पवार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. या राजीनामा नाट्याच्या दुसरा अध्याय सुरु झाला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शरद पवारांनी नवी खेळी खेळली आहे. शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवारांवर कोणतीही जबाबदारी सोपण्यात आलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेल उधाण आले आहे.  


प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेसह सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी


राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यासह सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेलांकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा राज्यांची जबाबदारी दिलीय. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवक, युवती आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आलीय. सुनील तटकरे हे राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या जबाबदारीसह ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी समस्या, अल्पसंख्याकांचे प्रश्न ही जबाबदारी देण्यात आलीय. राज्यातून जितेंद्र आव्हाडांकडेही बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, ओबीसी, एससी एसटी ही जबाबदारी देण्यात आलीय.