नवी दिल्ली : जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आज प्रथमच तपासाबाबत माहिती दिली. पोलीस उपाधीक्षक जॉय तिरके यांनी आतापर्यंत ९ हल्लेखोरांची ओळख पटल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे JNUSUची अध्यक्ष आईशी घोष हीचंही नाव संशयितांमध्ये असून तीच या हल्ल्याची सूत्रधार असल्याचं बोललं जातंय. ९ संशयितांमध्ये ७ डाव्या विद्यार्थी संघटनांचे तर २ अभाविपचे कार्यकर्ते आहेत. हल्ला नेमका का आणि कसा झाला, याचा तपास पोलीस करतायत. त्यासाठी सीसीटीव्ही फूटेज आणि हाती असलेल्या मोबाईल फूटेजचा आधार घेतला जातोय. या तपासासाठी वापरण्यात आलेली छायाचित्रंही पोलिसांनी आज दाखवली. काही व्हॉट्स अॅप ग्रूपची माहितीही हाती आली असून त्या आधारेही तपास सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारामध्ये ९ हल्लेखोरांची ओळख पटल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीये. विशेष म्हणजे या हल्ल्यात जखमी झालेली JNUSUची अध्यक्ष आईशी घोष हीचं नावही संशयित हल्लेखोरांच्या यादीत आहे. आईशीनं मात्र हे आरोप फेटाळले आहेत.


जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचाराच्या तपासाबाबत दिल्ली पोलिसांनी आज प्रथमच माहिती दिली. आतापर्यंत ९ हल्लेखोरांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये ७ जण डाव्या विद्यार्थी संघटनांचे असून २ उजव्या विद्यार्थी संघटनेचे, अर्थात अभाविपचे कार्यकर्ते असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी या संशयाला आधार देण्यासाठी काही छायाचित्रही पत्रकार परिषदेत दाखवली. 


विशेष म्हणजे JNUSUची अध्यक्ष आईशी घोष हीचंदेखील नाव पोलिसांनी संशयितांच्या यादीत टाकलं आहे. आईशी हीच या हल्ल्याची सूत्रधार असल्याची शंका आता व्यक्त केली जातेय. ५ तारखेला पेरियार हॉस्टेलमधल्या ठराविक खोल्यांमधील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये आईशी घोषही सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. विद्यापीठातील सर्व्हर बंद असल्यामुळे अनेक ठिकाणचं सीसीटीव्ही फूटेज हाती आलेलं नाही. उपलब्ध सीसीटीव्ही फूटेज आणि व्हायरल व्हीडियोच्या आधारे तपास केला जातोय. तसंच काही व्हॉट्सअॅप ग्रूपची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याचाही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.


पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच JNUSUनं पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी आपलं नाव यात गोवलं असलं तरी त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का, असा सवाल आईशीनं केला आहे.


दुसरीकडे या सर्व वादाचं मूळ असलेली फीवाढ मागे घेण्याबाबत आज जेएनयूचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयानं पाचारण केलं होतं. तसंच JNUSUच्या प्रतिनिधींशीही मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी चर्चा केली असून याबाबत लवकरच परिपत्रक निघेल अशी शक्यता आहे. मात्र फीवाढ मागे घेण्यात आली तरी कुलगुरू बदलण्याच्या मागणीवर JNUSU ठाम आहे.