लोकसभा निवडणुकीचा देशाच्या भवितव्यावर व्यापक परिणाम होईल- राष्ट्रपती
आगामी काळातील भारताचे यश हे संपूर्ण जगासाठी आदर्श ठरू शकते.
नवी दिल्ली: २१ व्या शतकातील वाटचालीच्यादृष्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. सद्यस्थितीत भारत निर्णायक टप्प्यावर उभा असून जनतेचा निकाल देशाचे भवितव्य निश्चित करेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ७०व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध मुद्द्यांचा वेध घेतला. त्यांनी म्हटले की, विविधता हेच भारताचे बलस्थान आहे. देशातील साधन संपत्तीवर सर्वांचा समान वाटा आहे. आगामी काळातील भारताचे यश हे संपूर्ण जगासाठी आदर्श ठरू शकते. आतापर्यंत भारतीय प्रजासत्ताक व्यवस्थेने खूप मोठा प्रवास केला आहे. त्यासाठी आपण मागील पिढ्यांचे आभार मानले पाहिजेत. मात्र, अजूनही देशाला खूप लांबचा पल्ला गाठायचा असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
यावेळी राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आगामी लोकसभा निवडणुकांचाही उल्लेख केला. सध्या भारत एका निर्णायक वळणावर उभा आहे. या टप्प्यावर घेतलेले निर्णय व कृती २१ व्या शतकातील भारताच्या भविष्याला आकार देणार आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक ही केवळ एका पिढीसाठी महत्त्वाची नसून संपूर्ण शतकावर याचा व्यापक परिणाम होणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले.
आपल्या भाषणात त्यांनी देशातील सर्व घटकांशी संवाद साधण्याची गरजही व्यक्त केली. कितीही अवघड परिस्थिती असली तरी चर्चेच्या संधी सातत्याने निर्माण केल्या पाहिजेत. वेगाने बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत आपण अशा चर्चांसाठी तयार राहिले पाहिजे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.