मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे विराजमान होणार आहे. शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून बोबडे यांच्या नावाची शिफारस गोगोई यांनी कायदा मंत्रालयाला केली. त्यानंतर आता न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रक्रियेनुसार सध्याचे सरन्यायाधीश पुढच्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठवतात. सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती भवनातून होते. बोबडे यांची नियुक्ती १८ नोव्हेंबर २०१९ ते २३ एप्रिल २०२१ पर्यंत या कार्यकाळाकरता झाली आहे. 


 सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी बोबडे सरन्यायाधीश म्हणून पदाची सूत्रे हातात घेतील. 


कोण आहेत शरद बोबडे?


सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार


शरद बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपूरमध्ये झाला. 


नागपूर विश्वविद्यालयातून बोबडेंनी एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. 


१९७८ साली ते महाराष्ट्र बार काऊंन्सिलचे सदस्य बनले.


१९९८ साली वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली.


२९ मार्च २००० साली बोबडेंची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदावर निवड करण्यात आली. 


१६ ऑक्टोबर २०१२ साली ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. 


सर्वोच्च न्यायालयात सध्या रंजन गोगोईंनंतर बोबडे हे सगळ्यात वरिष्ठ आहेत.


सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लागोपाठ ४० दिवस अयोध्या खटल्याची सुनावणी केली. 


बुधवारी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. गोगोई निवृत्त व्हायच्याआधी म्हणजेच १७ नोव्हेंबरच्या आत अयोध्या खटल्याचा निकाल येणार आहे.