मुंबई : अफगाणिस्तानवर आता तालिबानची सत्ता पुन्हा प्रस्तापित झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तान आणि तालिबानच्या हालचालींकडे आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात 3 तास अफगाणिस्तान मुद्द्यावर बैठक झाली. ही बैठक अतंत्य महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे. कारण भारत तालिबानबाबत आपली भूमिका स्पष्ट करू शकतो. भारताने तालिबानशी औपचारिक चर्चा सुरू केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहामध्ये तालिबान नेत्यांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत सुरक्षा आणि अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या लवकर परतण्याबाबत चर्चा झाली.


या बैठकीत मित्तल यांनी भारताबाबत सतावणारी चर्चा तालिबानसमोर ठेवली. भारताने म्हटले आहे की, अफगाणिस्तानची भूमी भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादासाठी कोणत्याही स्वरूपात वापरू नये. यावेळी तालिबान प्रतिनिधीने भारताला आश्वासन दिले की भारताच्या सर्व चिंता दूर केल्या जातील. 


दरम्यान, तालिबान आणि भारतचे संबंध कसे असतील यावर सध्या फक्त अंदाज वर्तवण्यात येत आहेत. 'अमेरिका कतारची राजधानी दोहा येथून अफगाणिस्तानच्या हालचालींकडे लक्ष देईल आणि भारतही आता तेच करत असल्याचे दिसत आहे...' असं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंटन यांनी केलं आहे. 


टोलो न्यूजनुसार, तालिबान आता नवं सरकार बनवण्याच्या विचारात आहे. लवकरचं नव्या सरकारची घोषणा केली जाऊ शकते. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनमुल्ला सामंगानी यांच्या मते हेबतोल्ला अखुंदजादा हे नवीन सरकारचे नेते असतील.