One Nation, One Fertilizer : जगामध्ये भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं. भारतातील शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचं पीक घेता यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (17 ऑक्टोबर 2022) प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना ‘एक राष्ट्र-एक उर्वरक’ ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत 'भारत यूरिया बॅग्स' (Bharat Urea Bag) देखील प्रदर्शित केलं. यामुळे कंपनींना एकाच ब्रँडच्या नावाने फर्टिलायझरच्या मार्केटिंगसाठी मदत मिळेल.
 
दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पुसा मेळा मैदानावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटनही केले. या योजनेअंतर्गत देशातील खतांची 3.30 लाखांहून अधिक किरकोळ दुकाने टप्प्याटप्प्याने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांमध्ये रूपांतरित केली जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी 'अ‍ॅग्री स्टार्टअप' (Agri Startup) परिषदेचे उद्घाटन केले आणि यावेळी 'इंडियन एज' या ई-मासिकाचं प्रकाशन देखील केले. नियतकालिकात अलीकडील घडामोडी, किमतीचे ट्रेंड विश्लेषण, उपलब्धता आणि वापर यासह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खतांच्या परिस्थितींबद्दल माहिती दिली जाईल आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील.


'वन नेशन-वन फर्टिलायझर'चा (One Nation, One Fertilizer) संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वस्त आणि दर्जेदार खते उपलब्ध होतील.


ते म्हणाले, “एक राष्ट्र एक खत शेतकऱ्याला सर्व प्रकारच्या संभ्रमातून मुक्त करणार आहे आणि चांगले खतही उपलब्ध होणार आहे. आता तेच नाव आणि तोच ब्रँड आणि त्याच दर्जाचा युरिया देशात विकला जाईल आणि हा ब्रँड म्हणजे 'भारत' आहे.


पीएम-किसान समृद्धी केंद्रांचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, ही अशी केंद्रे असतील जिथे केवळ खतेच नाही तर बियाणे आणि उपकरणे देखील उपलब्ध असतील आणि माती परीक्षण देखील केले जाऊ शकते. शेतकऱ्यांनाही सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.


या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया हे देखील उपस्थित होते.