नवी दिल्ली : राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर असलेले संकट आता कमी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शंभरहून अधिक आमदार जमवत सत्ता कायम ठेवली आहे. दरम्यान, आता सचिन पायलट यांचे मन वळवण्यावर भर देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी, प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल, अहमद पटेल आणि पी. चिदंबरम यांच्यासह सोमवारी पाच मोठ्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. प्रत्येकाने सचिन पायलट यांना जयपूरला जाण्यास सांगितले आहे. जेणेकरून स्थानिक पातळीवर पुढील चर्चा होऊ शकेल.


सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन पायलट यांनी अशी मागणी केली आहे की, त्यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडे ठेवायचे आहे, तसेच त्यांचे चार समर्थक आमदारांना मंत्री बनवू इच्छित आहेत आणि अर्थ-गृह मंत्रालय त्यांना ठेवू इच्छित आहे. या प्रस्तावासाठी एक नेता जयपूरलाही जाईल.


विशेष म्हणजे, आता प्रियंका गांधी वाड्रा स्वत: या प्रकरणात सक्रिय झाल्या आहेत आणि दोन्ही नेत्यांशी चर्चा करीत आहेत. यापूर्वी सचिन पायलट यांनी असा दावा केला होता की, त्यांच्यासोबत 25 हून अधिक आमदार आहेत.


दुसरीकडे दुपारपर्यंत अशोक गहलोत यांनी जयपूरमध्ये आपले सामर्थ्य दाखवून शंभरहून अधिक आमदारांच्या सहकार्याने विजयाचे चिन्ह दर्शविले. विशेष म्हणजे सरकारला वाचवण्यासाठी शंभर आमदारांची गरज आहे आणि आता अशोक गहलोत गटाचा दावा आहे की त्यांच्याकडे 107 आमदार आहेत.