नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना शनिवारी उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला. प्रियांका गांधी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (CAA) आंदोलनावेळी अटक झालेले माजी सनदी अधिकारी एस.आर. धरपुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या. यावेळी प्रियांका गांधी यांच्यासोबत वाहनांचा नेहमीचा ताफा नव्हता. त्या एका कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवर बसून धरपुरी यांच्या कुटुंबीयांना भेटायला निघाल्या होत्या. मात्र, यावेळी पोलिसांनी आपल्याला रस्त्यात अडवले. पोलिसांकडून आपला गळा दाबण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी प्रियांका गांधी यांना मोटारसायकलवरून उतरवल्यानंतर त्या रस्त्यावरून चालत धरपुरी यांच्या घराच्या दिशेने निघाल्या. यावेळी पोलीस त्यांच्यापाठी धावत होते. मात्र, प्रियांका गांधी ऐकायला तयार नव्हत्या. त्या आपल्या कार्यकर्त्यांसोबत मार्गक्रमण करत राहिल्या. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून हा व्हीडिओ ट्विट करण्यात आला आहे. मात्र, आता या घटनेमुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.


थोड्याचवेळात यासंदर्भात काँग्रेसची पत्रकारपरिषद होत आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्या सुष्मिता देव प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. तत्पूर्वी उत्तर प्रदेश काँग्रेसकडूनही यासंदर्भात पत्रक जारी करण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधी यांना रस्त्यात रोखून धक्काबुक्की केली. एका पोलिसाने प्रियांका गांधी यांचा गळा पकडून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियांका गांधी त्यांना ऐकल्या नाहीत. तब्बल आठ किलोमीटर चालत त्यांनी एस.आर. धरपुरी यांचे घर गाठले आणि त्यांच्या आजारी पत्नीची भेट घेतली, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.


यापूर्वी मेरठमध्ये यूपी पोलिसांना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांना जिल्ह्याच्या सीमेवरून परत पाठवले होते. CAA विरोधात निदर्शने करताना मेरठमध्ये मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या राहुल आणि प्रियांका यांनाही मंगळवारी रात्री पोलिसांनी अडवले होते.