लखनऊ: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राजस्थानचे काँग्रेस आमदार धीरज गुर्जर यांना यांना वाहतूक विभागाने दुचाकीवर बसताना हेल्मेट न परिधान केल्याबद्दल ६१०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रियांका गांधी शनिवारी निवृत्त पोलीस अधिकारी एस.आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले होते. यावेळी प्रियांका गांधी धीरज गुर्जर यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या.  दोघांनीही दुचाकीवर बसताना हेल्मेट घातले नव्हते. दरम्यान पोलिसांनी त्यांना रस्त्यात गाठून दारापुरी यांच्या घरी जाण्यास मज्जाव केला. पोलिसांनी आम्हाला घेरले. मला रोखण्यासाठी माझा गळा दाबला आणि मला खाली पाडण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप प्रियांका गांधी यांनी केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर प्रियांका गांधी यांनी पोलिसांना चकवा दिला. तब्बल आठ किलोमीटर चालत त्यांनी एस.आर. दारापुरी यांचे घर गाठले आणि त्यांच्या आजारी पत्नीची भेट घेतली, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. 



केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यापासून सुधारित मोटर वाहन कायद्यातील नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. नव्या तरतुदींमुळे वाहन नियम तोडल्यास होणाऱ्या शिक्षा आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली होती. एरवी राजकारणी आपल्या पदाचा धाक दाखवून अशा नियमांपासून पळ काढताना दिसतात. मात्र, उत्तर प्रदेशच्या वाहतूक विभागाने कायदा सर्वांसाठी समान असतो हे दाखवून दिले आहे.