प्रियंका गांधी-वाड्रा यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आज धार्मिक राजकारणाचे केंद्र असलेल्या अयोध्याला भेट दिली.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आज धार्मिक राजकारणाचे केंद्र असलेल्या अयोध्याला भेट दिली. मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा करुन त्या अयोध्यात पोहोचल्या. दुपारी अडीच वाजता एका शाळेत विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. संध्याकाळी साडेचार वाजता अयोध्यातील हनुमान लल्लांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा रोड शो सुरू झाला. एकूण नऊ ठिकाणी प्रियंका यांनी मतदारांशी संवाद साधला. काँग्रेसचे फैजाबादमधील उमेदवार डॉ. निर्मल खत्री यांच्या प्रचारासाठी त्या अयोध्येमध्ये आल्या होत्या. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या अयोध्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभर फिरतात मात्र, त्यांना आपल्या लोकांची भेट घ्यायलाही वेळ नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. प्रियंका शुक्रवारी अयोध्येत प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी एका सभेत बोलताना त्यांनी मोदींवर टीका केली.
मी वाराणसीतल्या जनतेला विचारले की पंतप्रधानांनी त्यांच्या गावांना भेटी दिल्या का? त्यावर पंतप्रधानांनी एकदाही भेट दिली नसल्याचे लोकांनी सांगितले. या उत्तरामुळं मी आश्चर्यचकित झाले, कारण त्यांच्या प्रचारावरुन मला वाटले की त्या नक्कीच इथल्या जनतेसाठी काहीतरी करीत असतील. त्यांनी जगभर दौरे केले असून प्रत्येकाची गळाभेटही घेतली आहे. मात्र, त्यांना आपल्याच लोकांची गळाभेट घ्यायला वेळ नाही, असे त्यांनी जोरदार टीका केली.