जे.पी नड्डांचा पश्चिम बंगाल दौरा, भाजप नेत्यांच्या गाडीवर दगडफेक
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते जात होते. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते विजयवर्गीय यांच्या गाडीवर दगडफेक केली. यापूर्वी देखील तृणमूलवर भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप होत आला आहे. तृणमूलने मात्र हे आरोप फेटाळून लावले.
जे.पी नड्डा दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर आहेत. आज त्यांचा दौऱ्याचा हा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.
जे.पी नड्डा यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले पक्षाचे बॅनर देखील फाडण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये 'जंगल राज' सुरू असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी केला.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय म्हणाले की, "बंगालमध्ये कायद्याचे राज्य संपले आहे." विरोधी पक्षांना त्यांचे कार्यक्रम घेण्याची परवानगी मिळत नाही. राज्यात जंगल राज्य सुरू आहे. तृणमूल काँग्रेसने मात्र हे आरोप 'निराधार' आणि 'राजकीयदृष्ट्या प्रेरित' आहेत असं म्हटलं आहे.
नड्डा हे राज्यातील भाजपच्या कामाचा आढावा घेतील आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाच्या अभियानात भाग घेतील. आगामी 2021 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी हे कार्यक्रम होत आहेत.