नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली असून सर्व मोठ्या राजकीय पक्षांना याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा केंद्र सरकार सर्व पक्षांना देणार असल्याचे गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण देश या मुद्द्यावरुन एकसंघ राहावा यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर तात्काळ कॉंग्रेसची पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये आम्ही या प्रकरणी सरकारच्या सोबत आहोत असे त्यांनी म्हटले होते. शिवसेना खासदार अरविंद केजरीवाल यांनी देखील आपण बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे.


दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांची ओळख त्यांचे आयकार्ड, आधार कार्ड यावरून करण्यात आली. भीषण विस्फोटानंतर त्यांचे मृतदेह छिन्नविछ्छिन्न अवस्थेत होते. यामुळे ओळख पटवणे कठीण गेले. काहींच्या मनगटावर असलेल्या घड्याळावरून तसेच त्यांच्याकडे असलेल्या सामानावरून त्यांची ओळख पटवली गेली. त्यांच्या सहकार्यांनी या वस्तू ओळखल्या. 


 पंतप्रधानांनी पुलवामाच्या शहीदांना हात जोडून आणि माथा टेकवून श्रद्धांजली दिली. शहीद जवानांचे पार्थिव घेऊन वायुसेनेचे विशेष विमान संध्याकाळी पालम वायुसेना क्षेत्रात पोहोचले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.