`भारत के वीर` पोर्टलवर 36 तासात 7 कोटी रुपये जमा
शहिदांच्या कुटुंबियांच्या आर्थिक मदतीसाठी `भारत के वीर` हेच पोर्टल अधिकृत
नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील विविध संघटना आणि सामान्य नागरिकांकडून शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि महाराष्ट्रातील साईबाबा ट्रस्ट देखील अग्रणी आहेत. 'भारत के वीर' या पोर्टलवर शहिदांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत पाठवता येते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर या पोर्टलला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 7 कोटी रुपयांची रक्कम विविध भागातून गोळा झाली. गुरूवारी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले.
शहिदांच्या कुटुंबियांच्या आर्थिक मदतीसाठी 'भारत के वीर' हेच पोर्टल अधिकृत असून इतर कोणत्याही मार्गाने पैसे पाठवू नयेत असे आवान केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. गेल्या 36 तासात या ऑनलाईन पोर्टलवर अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्याचे बीएसएफचे महानिरिक्षक (आयजी) अमित लोधा यांनी सांगितले.
अमिताभही मदतीसाठी
बिग बी अमिताभ बच्चन यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. कुठे आणि कशा पद्धतीने ही राशी तात्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न केला जास्त असल्याचे अमिताभ यांच्या सचिवाने सांगितले.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर संस्थानातून देखील सीआरपीएफच्या शहिद जवानांच्या परिवारासाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे. साई संस्थानने 2.51 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (एसएसएसटी) जम्मू काश्मीरमध्ये 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबियांना 2.51 कोटी रुपये देईल अशी घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी केली.