मुंबई / नवी दिल्ली : आज सर्व देश त्यांना सलाम करतोय. पाणावलेल्या डोळ्यात राग, क्रोध, संताप आहे. आता देशाला हवा आहे बदला. जवान हुतात्मा झाले आणि अमर झाले. पण आता हे बलिदान व्यर्थ न जाऊ देण्याची जबाबदारी या देशाची आहे. भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणे, दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशाला जन्माची अद्दल घडवण्याची वेळ आली आहे. प्रत्येक देशवासीय या शहीद शूरजवानांचं हौताम्य विसरणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पुण्यातील कश्मिरी तरुणांनी निषेध केलाय. हल्ल्यातील शहिदांचं बलिदान देशानं विसरायला नको. त्यांना मारणाऱ्यांना कधीच स्वर्ग लाभू शकत नाही. बंदूक हा कुठल्याच समस्येवरील उत्तर नसून काश्मिरी जनतेला शांती हवी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर काश्मिरात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा औरंगाबादमधल्या तरुणांनीही निषेध केला.



पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुंबईतल्या भेंडी बाजारात मुस्लीम तरूणांनी निषेध केला. भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भेंडी बाजारातली दुकानंही बंद ठेवण्यात आली होती. यावेळी तरूणांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच तिरंगाही फडकवण्यात आला. भेंडीबाजारातल्या तरूणांनी तिरंग्यासह रॅली काढली होती. या रॅलीत मुस्लीम तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तान असल्याचा आरोप करीत यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांचाही सहभाग होता.



सैनिकांचं गाव अशी सातारा जिल्ह्यातील अपशिंगे या गावाची ओळख. या गावातील प्रत्येक घरातून एक तरी तरुण देशसेवेसाठी सैन्यदलात भरती होतो. या गावातील ग्रामस्थ आणि माजी सैनिकांनी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्यात. 'आमच्या आत्म्यावर घाव बसलाय, आजचा दिवस दु:खाचा दिवस आहे. आम्ही सर्व विरोधक सरकारसोबत आहोत, शहिदांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे.


पाकिस्तानला अमेरिकेची दमबाजी


पुलवामा इथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा अमेरिकेने कठोर शब्दात निषेध केलाय. दहशतवादाला थारा देणं थांबवा असा सज्जड दम अमेरिकेने पाकिस्तानला थेट दिला आहे. दहशतवादाला असलेला पाठिंबा थांबवा आणि दहशतवादी संघटनांना आपल्या भूमीचा वापर करू देणं पाकिस्तानने तातडीने थांबवावं असा सज्जड दम पाकिस्तानला देण्यात आलाय. दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिकेचा भारत सरकारला संपूर्ण पाठिंबा असल्याचं अमेरिकेच्या गृहखात्याने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.