श्रीनगर : जम्मूमधील ड्रोन हल्ल्याला 24 तास देखील झाले नसताना दहशतवाद्यांनी पुलवामामधील माजी विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या (SPO) घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. पुलवामा येथील हरिपरीग्राम गावात स्थित माजी एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात फैयाज अहमद यांचा जागीचं मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या. 



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैयाज अहमद यांच्या पत्नीने रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामा येथील अवंतीपोरा भागातील हरीपरीगाम येथे एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरात रात्री अकराच्या सुमारास दहशतवाद्यांनी घुसून कुटुंबावर गोळीबार केला.
 
 पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी लष्कर-ए-तोयबाचा एक पथक 'रेसिस्टेंस फोर्स'शी निगडीत असलेल्या एका दहशतवाद्याला अटक केली. त्याच्याकडून 505 किलोग्राम आयईड जप्त केली. जम्मूचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक चंदन कोहली यांनी अटक आरोपीची ओळख नदीम-उल-हक अशी केली आहे.