पंजाबमध्ये सीमा सुरक्षा दलाकडून एका संशयिताला अटक
संशयिताचा मोबाईल नंबर पाकिस्तानमधील आठ संघटनांशी जोडलेला आहे.
चंडीगढ : पंजाबमधील फिरोजपूरमधून सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या फिरोजपूरजवळील आऊट पोस्टजवळ ही कारवाई आली आहे. या २१ वर्षीय संशयिताकडून पाकिस्तानी सीम कार्ड हस्तगत करण्यात आले आहे. तसेच इतरही सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. संशयित तरूण उत्तर प्रदेशातील मुरादाबादचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तरूणाचे सोशल मीडिया अकाउंट इस्लामिक समूहांशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. या संशयिताकडून पाकिस्तानी सीम कार्ड आणि एक कॅमेरा जप्त करण्यात आला आहे. त्याचा मोबाईल नंबर पाकिस्तानमधील आठ संघटनांशी जोडलेला आहे. त्याच्याजवळ आणखी सहा पाकिस्तानी नंबरही मिळाले आहेत. हा पाकिस्तानी संशयित तेथील बीएसएफचे फोटो काढत असल्याची माहिती मिळाली आहे. संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.
भारतीय सेनेच्या तीनही दलांनी पूर्णत: सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. भारताने केलेल्या एयर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून भारतातील सैन्य ठिकाणांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतरही पाकिस्तानच्या वायुसेनेकडून जम्मू-काश्मीरमधील राजौरीत हवाईक्षेत्राचे उल्लंघन करण्यात आले होते. परंतु पाकिस्तानचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. या तणावामुळेच सीमेवर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेव्यवस्थेअंतर्गत सीमेलगतच्या अनेक भागात शोध मोहिम सुरू आहे.