चंडीगड : पंजाबच्या (Punjab) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे राजकारण झपाट्याने बदलत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू यांच्यानंतर त्यांच्या जवळच्या नेत्या रजिया सुल्ताना (Razia Sultana) यांनीही मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंजाबचे आणखी बरेच नेते सिद्धूच्या समर्थनासाठी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.


अनेक नेत्यांचे राजीनामे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅबिनेट मंत्री बनलेल्या रझिया सुल्ताना यांच्यासोबतच योगेंद्र धिंग्रा यांनीही प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याशिवाय काँग्रेसचे राज्य कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल, जे सिद्धू यांचे समर्थक मानले जातात, यांनीही राजीनामा दिला आहे. लवकरच आणखी बरेच नेते पदाचा राजीनामा देऊ शकतात.


परिस्थिती सांभाळण्याचं मुख्यमंत्र्यांसमोर आवाहन


सिद्धू समर्थक कॅबिनेट मंत्री परगट सिंह (Pargat Singh) यांच्या राजीनाम्याबाबतची चर्चाही रंगली होती. पण आपण राजीनामा दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच सिद्धू यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही परगट सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्याचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सर्व नेत्यांशी बोलून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थिती काँग्रेसच्या हातातून सुटताना दिसत आहे.


दरम्यान, मंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या रझिया सुल्ताना म्हणाल्या की, सिद्धू हे तत्वनिष्ठ व्यक्ती आहेत. ते पंजाब आणि पंजाबच्या नागरिकांसाठी लढत आहेत. रझिया सुल्ताना यांनी रविवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. रजिया सुल्ताना यांचे पती आणि राज्याचे आयपीएस अधिकारी मुहम्मद मुस्तफा यांनी त्यांच्या राजीनाम्यावर अभिमान व्यक्त केला आहे.


नवज्योतसिंग सिद्धू यांचा राजीनामा


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्वांसमोर सिद्धूंना विरोध केला होता. इतकच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही असंही म्हटलं होतं. सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी सिद्धू नाही तर चरणजीत सिंह चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली.