Birthday girl dies after eating cake: आपल्या 10 वर्षाच्या लेकीचा वाढदिवस परिवाराला थाटामाट साजरा करायचा होता. यानिमित्ताने त्यांनी ऑनलाइन केक ऑर्डर केला. बर्थडे झाला पण मुलीचा जीव गेला. पंजाबमधून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेत परिवारातील 4 सदस्य कसेबसे वाचले आहेत. काय घडला नेमका प्रकार? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढदिवसाचा केक खाऊन 10 वर्षाची मुलगी मानवी आणि तिच्या संपूर्ण परिवाराची तब्येत बिघडली. दुसऱ्या दिवशी सकाळी बर्थडे गर्लचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीची आई काजलच्या तक्रारीनंतर अनाज मंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


24 मार्च रोजी मानवीचा जन्मदिवस होता. यानिमित्ताने आम्ही दुकानातून संध्याकाळी 7 वाजता केक ऑर्डर केला. पण केक खाल्ल्याने आमच्या परिवारातील सर्व सदस्यांची तब्येत बिघडली. माझी मुलगी मानवीला उलट्या होऊ लागल्या. पहाटे 4 वाजता तिचे शरीर थंड पडले होते. यानंतर आम्ही तिला रुग्णालयात नेले पण तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याची माहिती काजल यांनी पोलिसांना दिली. 


ज्या दुकानातून परिवाराने केक मागवला, त्यांच्याशी आम्ही संपर्क केला. पण त्यांनी असा कोणता केक पाठवलाच नसल्याचे त्यांचे म्हणणे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर इंडिया बेकरीचे मालक गुरप्रित यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमन नगरमधील आमच्या दुकानातून केक दिला गेला नव्हता. आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. मानवीच्या परिवाराने ऑनलाइन केक ऑर्डर केला होता, असे ते म्हणाले. 


याप्रकरणी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मानवीच्या परिवाराने 26 मार्चला नागरी आरोग्य विभागात यासंबंधी तक्रार दिली होती.  यानंतर इतके दिवस होऊनही आरोग्य विभागाकडून दुकानातील केकचे सॅम्पलिंग झाले नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी परिवाराकडूनही केकचा तुकडा अद्याप गोळा केला नाही. आरोग्य विभागाने केकचा तुकडा घेण्यास नकार दिल्याचा आरोप घरातील मंडळींनी केलाय. 10 वर्षीय मुलीचा मृत्यू होऊनही विभागीय अधिकाऱ्यांचे डोळे उघडले नाहीत. शहरात किती ठिकाणी बेकऱ्या आहेत? केक, पेस्ट्रीसारखे पदार्थ कोण आपल्या घरी तयार करतं? याची कोणतीच माहिती विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे.