रुग्णालयात भीषण आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावत वाचवले रुग्णांचे प्राण
रुग्णालयाला आग लागली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली, आगीचा भीषण VIDEO
पंजाब : अमृतसर इथल्या गुरु नानक देव रुग्णालयाच्या ओपीडीच्या मागील बाजूस शनिवारी दुपारी अचानक आग लागली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरला ही आग लागली. आग इतकी भीषण होती की तिच्या ज्वाळा दुरून दिसत होत्या.
आग लागल्याचं कळताच जीव वाचवण्यासाठी लोकं सैरावैरा पळू लागले. रुग्णालय व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर रुग्णांची सुटका केली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. श्री अमृतसर साहिब इथल्या गुरु नानक रुग्णालयात आग लागल्याची घटना दुर्दैवी आहे. अग्निशमन दलाचे जवान तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत. देवाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंत्री हरभजन सिंग घटनास्थळी पोहोचले आहेत...मी सतत मदत कार्यावर लक्ष ठेवून आहे,असं ट्विट भगवंत मान यांनी केलं आहे.
दिल्लीतल्या आगीत 27 जणांचा मृत्यू
दरम्यान, काल दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला काल संध्याकाळी भीषण आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दुर्देवाने या आगीत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.