Satyanarayan Nandlal Nuwal Success Story: दहावी पास असलेला तरुण, ज्याच्याकडे खाण्याची भ्रांत आहे, तो रेल्वे स्थानकावर राहून दिवस घालवतोय, तो भविष्यात हजारो कोंटींच्या कंपनीचा मालक होईल असे कोणी म्हटलं तर? कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही. पण हे प्रत्यक्षात खरं झालंय. यशस्वी पुरुषांच्या कहाण्यांमागे खूप मोठा संघर्ष दडलेला असतो. प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण नंदलाल नुवाल हे नाव त्यापैकीच एक आहे.. त्यांची कंपनी सोलर इंडस्ट्रीज औद्योगिक स्फोटके आणि दारूगोळा तयार करते. ज्याचा पाया त्यांनी अवघ्या 1000 रुपयांमध्ये रचला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यनारायण नुवाल यांनी 1995 मध्ये सुरु केलेली कंपनी आज 65 देशांमध्ये पसरली आहे.  औद्योगिक स्फोटके बनवणाऱ्या सर्वात मोठ्या उत्पादकांमध्ये त्यांची गणना केली जाते. मोठा उद्योगपती होण्यासाठी मोठ्या पदव्या आणि परदेशी शिक्षण आवश्यक  किंवा मोठ्या घरात जन्म घ्यायला हवा असं तुम्हालाही वाटतं का? तर मग समज चुकीचा आहे. सत्यनारायण नुवाल यांनी हा समजही बदलला. दहावीपर्यंतच शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर हा व्यवसाय उभा केला. 


छोट्याश्या किराणा दुकानात काम 


राजस्थानमधील भिलवाडा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात सत्यनारायण यांचा जन्मा झाला. जेमतेम शिक्षण घेता येईल इतकीच त्यांच्या घरची परिस्थिती होती. त्यामुळे त्यांना दहावीनंतर शिक्षण सोडावे लागले. छोट्याश्या किराणा दुकानात ते सहाय्यक म्हणून काम करू लागले. पण त्यांचा किमान खर्चही त्यातून भागत नव्हता.  
सत्यनारायण नुवाल यांनी शाईचा व्यवसाय सुरू केला, पण तो ठप्प झाला. अनेक छोटे-मोठे उद्योग ते करत राहिले. यात त्यांना यश मिळत नव्हते. सारखे अपयशच वाट्याला येत राहिले. अनेकवेळा पराभूत होऊनही त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. 


 1000 रुपये देऊन परवाना


वयाच्या 19 व्या वर्षी सत्यनारायण नुवाल यांचे लग्न झाले. लग्नामुळे जबाबदारीदेखील वाढली होती.यामुळे राजस्थानात राहून चालणार नाही, हे त्यांना समजले होते. महाराष्ट्रात त्यांन खुणावत होता. येथील बल्लारशाह येथे ते आले. त्यांची भेट अब्दुल सत्तार अल्ला भाई यांच्याशी झाली.अब्दुल यांच्याकडे स्फोटकांचा परवाना होता पण ते वापरत नव्हते. सत्यनारायण यांनी त्यांच्याकडून 1000 रुपये देऊन परवाना घेतला. हाती पैसे नव्हते पण थोडे थोडे पैसे देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि परवाना घेतला. वेळ न घालवता त्यांनी व्यवसाय सुरू केला.


रात्री रेल्वे स्थानकांवर काढल्या 


कोणत्याही अनुभवाशिवाय आणि मोठ्या बँक बॅलन्सशिवाय औद्योगिक स्फोटक उद्योगात प्रवेश करणे अजिबात सोपे नव्हते. सुरुवातीलाच त्यांना अनेक अडचणी आल्या. आर्थिक चणचण एवढी वाढली की, त्यांच्याकडे खोलीचे भाडे भरण्यासाठीही पैसे उरले नाहीत. जेवणासाठी किंवा भाड्यासाठी पैसे नव्हते. वेळप्रसंगी त्यांना अनेक रात्री रेल्वे स्थानकांवर काढाव्या लागल्या. पण भविष्यात आपण काहीतरी चांगल करु हे त्यांनी मनात निश्चित केलं होतं. अडचणी तर ढीगभर येत होत्या पण हार मानून शांत बसणारे नव्हते. हळूहळू त्यांनी व्यवसाय सुरू केला. 1995 मध्ये त्यांनी SBI कडून 60 लाख रुपयांचे कर्ज घेतले. एक लहान स्फोटक उत्पादन युनिट स्थापन केले. ज्यापैकी कोल इंडिया लिमिटेड हा त्यांचा विश्वासू ग्राहक बनला.


भविष्यातील उद्योग ओळखला 


येणारा काळ सौरऊर्जा आणि हरित ऊर्जेचा असणार आहे हे सत्यनारायण यांनी ओळखले होते. स्फोटक पदार्थांनंतर त्यांनी 1996 मध्ये सौरऊर्जेवर काम करायला सुरुवात केली. त्यांनी सोलार एनर्जी इंडस्ट्रीजसोबत आपला व्यवसाय वाढवला. आज त्यांच्या कंपनीत 7000 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. प्रचंड मेहनत घेतली आणि करोडोंचा व्यवसाय उभा केला. फोर्ब्सच्या मते, सत्यनारायण यांची एकूण संपत्ती 5.7 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 4,75,88,41,65,000 रुपये आहे. त्यांच्या कंपनीचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे.