राहुल आणि प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
देशातील जीएसटीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर प्रियंका गांधी - वाड्रा यांनी बेरोजगारीत मोदी सरकारने भर घातल्या टीका केली.
नवी दिल्ली : देशातील जीएसटीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. देशात काँग्रेसचे सरकार आले तर जीएसटीत बदल करण्याबरोबर देशात एकच कर प्रणाली असेल असे स्पष्ट केले. तर त्याचवेळी उत्तर प्रदेशात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी - वाड्रा यांनी बेरोजगारीत मोदी सरकारने भर घातली आहे. अनेकांची भ्रमनिरास या केंद्र सरकारने केला आहे. अंगणवाडी सेविकांना १७ हजार रुपयांचे मानधन देण्याचे कबूल केले. मात्र, केवळ पोकळ आश्वासने देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांपासून ते तरुणांपर्यंत देशात सर्वच दुःखी आहेत. आता ही जनताच सत्ता परिवर्तन घडवेल, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
केंद्राने लागू केलेल्या जीएसटीची गब्बरसिंग टॅक्स, अशी खिल्ली राहुल गांधी यांनी उडवली. गब्बरसिंग टॅक्स रद्द करून खरा जीएसटी आम्ही २०१९ ला सत्तेत आल्यास लागू करू असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. देशभरात ५ वेगवेगळे टॅक्स नाही तर एकच टॅक्स असेल असे राहुल म्हणाले.
प्रियंका गांधी यांनी मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांपासून ते तरुणांपर्यंत मोदी सरकारच्या काळात देशात सर्वच दुःखी आहेत. प्रियंका गांधी यांनी मोदींच्या वाराणसी मतदारसंघात गंगा नदीतून बोटीद्वारे तीन दिवसांची 'गंगा यात्रा' सुरू केली आहे. यात प्रियंका गांधी ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने काय विकास केला?, असा प्रश्न भाजपचे नेते करत आहेत. पण भाजपने गेल्या दोन वर्षांत उत्तर प्रदेशचा काय विकास केला? हे जनतेसमोर मांडवे, असे आव्हान प्रियंका गांधी यांनी दिले.
भाजपने आंगणवाडी सेविका आणि शिक्षणसेवकांना १७ हजार रुपये महिना पगाराचे आश्वासन दिले. पण अद्याप हे आश्वासन पूर्ण केले का? नाही. भाजपची विकास कामे फक्त कागदावरच आहेत. प्रत्यक्षात या सरकारने काहीच विकास केला नाही. मी रोज लोकांशी संवाद साधतेय. सर्वच दुःखी आहेत, असे प्रियंका म्हणाल्या.