नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात एका रात्रीत नोटबंदी जाहीर केली आणि १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यात. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता झाली. त्यानंतर नोटबंदीमुळे अनेकांचे आयुष्य बरबाद झाले. मात्र, जुन्या नोटा बदलण्यात काहींनी हात धुवून घेतले. यात भाजपमधील काही नेत्यांचा समावेश आहे. यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजप अध्यक्षांना खडेबोल सुनावलेत.  तुमच्या या कार्याबद्दल तुम्हाला सलाम. अमित शाहजी अभिनंदन. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक संचालक. तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या शर्यतीत पहिले स्थान प्राप्त केले. नोटाबंदीच्या ५ दिवसांमध्ये ७५० कोटी रुपये बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सलाम. 



 मोहन भागवत -अमित शाह बोलणार का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, नोटाबंदीदरम्यानच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या काही सहकारी बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच नोटाबंदी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलाय. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला.  माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीचे कागदपत्रे जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी याबाबत बोलणे गरजेचे आहे. नोटाबंदीच्या काळात भाजप आणि आरएसएसने किती संपत्ती खरेदी केली आणि त्याची एकूण रक्कम किती होती, याची माहिती त्यांनी द्यायला हवी. नोटाबंदी सर्वात मोठा गैरव्यवहार आहे. त्यामुळे याची सविस्तर आणि निष्पक्षपणे चौकशी केली जावी, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली. 


अमित शाह ज्या बँकेचे संचालक आहेत. त्या बँकेने नोटाबंदीनंतर ७०० कोटींपेक्षा जास्त रुपये जमा केले. गुजरातमध्ये भाजप नेते संचलित ११  बँकांमध्ये अवघ्या ५ दिवसांमध्ये ३११८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये जमा करण्यात आले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे पंतप्रधान मोदी याप्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.