नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरक्षेशिवाय विद्यापीठांत जाऊन विद्यार्थ्यांशी समोरासमोर बोलण्याची हिंमत नाही, अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते सोमवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींना आव्हान दिले. मोदींनी पोलीस सुरक्षा न घेता देशातील कोणत्याही विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांशी समोरासमोर संवाद साधून दाखववा. देशासाठी आपण काय करणार आहोत, हे त्यांनी सांगावे. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला का गेली आहे, बेरोजगारी का वाढली आहे, हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगायला हवे. मात्र, नरेंद्र मोदींमध्ये विद्यार्थ्यांशी समोरासमोर बोलण्याची हिंमतच नाही, अशी टीका राहुल यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणांच्या समस्यांविषयी बोलण्याऐवजी मोदी जनतेमध्ये फूट पाडण्याचा आणि लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरूणांनी उठवलेला आवाज योग्य आहे. तो दडपता कामा नये. सरकारने तरुणांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. 



आज दिल्लीत सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत नागरिकत्व संशोधन विधेयक (सीएए) या विरोधात झालेले आंदोलन आणि अनेक विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर उद्भवलेली परिस्थिती, देशातील आर्थिक मंदी यासारख्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. 


यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी-शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातील लोकांची दिशाभूल करीत आहे. केंद्रातील मोदी सरकार संविधानाला कमकुवत करीत आहे, सरकारकडून लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.