पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'अपशकुनी' आणि 'पाकिटमार' म्हणणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. राहुल गांधी यांनी जाहीर सभेत भाषणा करताना वर्ल्डकपमधील पराभवासाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरत अपशकुनी म्हटलं होतं. यानंतर भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. राहुल गांधींना स्पष्टीकरण देण्यासाठी शनिवारपर्यंत वेळ देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील वर्ल्डकप फायनलला हजेरी लावली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला होता. याचाच आधार घेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी मैदानात असल्याने पराभव झाल्याचं विधान केलं होतं. PM म्हणजे 'पनवती मोदी' असंही राहुल गांधी सभेत म्हणाले होते. 


नेमकं काय झालं होतं?


राहुल गांधी प्रचारसभेत बोलत असताना गर्दीतून लोक पनवती असं ओरडू लागले होते. त्यानंतर राहुल गांधी हसत म्हणाले की, "आपली मुलं वर्ल्डकप जिंकले असते. पण तिथे पनवती आले आणि हरवलं. टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, पण जनतेला माहिती आहे". राहुल गांधींनी यावेळी नरेंद्र मोदींचं नाव घेणं टाळलं होतं. पण नंतर त्यांनी दुसऱ्या एका सभेत PM म्हणजे 'पनवती मोदी' असं म्हटलं. 


"कधी क्रिकेट सामन्यात जातील. पण तिथे हरवलं ही वेगळी गोष्ट आहे. पनवती...PM म्हणजे पनवती मोदी. कधी इकडे, कधी तिकडे घेऊन जातात," असं राहुल गांधी दुसऱ्या एका सभेत म्हणाले. 



भाजपाने आपल्या तक्रारीत असेही आरोप केले आहेत की, राहुल गांधी यांनी राजस्थानमधील त्यांच्या प्रचारादरम्यान अपमानजनक शब्द वापरले आणि निराधार आरोप केले. राजस्थानमध्ये शनिवारी विधानसभा निवडणुका होणार आहेत. ज्येष्ठ नेत्यासाठी अशी भाषा वापरणं अशोभनीय असल्याचंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे. 


नरेंद्र मोदींचा पाकिटमार म्हणूनही उल्लेख


राजस्थानमधील सभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना पाकिटमारही म्हटलं. "जेव्हा पकिटमारांना एखाद्याचा खिसा कापायचा असतो तेव्हा ते सर्वप्रथम लक्ष विचलित करतात. एक पाकिटमार समोरून येतो आणि लक्ष विचलित करतो, दुसरा मागून खिसा कापतो आणि तिसरा गरज पडेल तेव्हा धमकावतो. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी लक्ष वळवतात, अदानी खिसे कापतात आणि अमित शहा लाठीमार करतात," असं राहुल गांधी म्हणाले होते. 



आपल्या नोटीसमध्ये, निवडणूक आयोगाने निदर्शनास आणून दिले की आदर्श आचारसंहिता नेत्यांना राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर निराधार आरोप करण्यास मनाई करते.