इंडिया फर्स्ट; ट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर
डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र असल्याचे सांगतात.
नवी दिल्ली: अमेरिकेला hydroxychloroquine या औषधाचा पुरवठा न केल्यास भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र असल्याचे सांगतात. या अनुषंगाने राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मैत्री म्हणजे प्रत्युत्तर देणे नसते. कोरोनासारख्या संकटाच्या काळात भारताने इतर देशांना जरूर मदत केली पाहिजे. मात्र, जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेली औषधे भारतात पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेला मदत केली नाही तर भारताला परिणाम भोगावे लागतील- ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा न केल्यामुळे भारताला गर्भित इशारा दिला होता. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बोललो होतो. hydroxychloroquine औषध पुरवले तर अमेरिका तुमची आभारी राहील, असे मी त्यांना सांगितले. मोदींना ते शक्य झाले नाही तरी ठीक आहे. मात्र, याला जशास तसे उत्तर नक्कीच दिले जाईल. किंबहुना ते का दिले जाऊ नये, असा धमकीवजा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आगामी काळात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवल्यास अमेरिका भारताची अडवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सगळ्यानंतर भारताकडून २४ औषधे आणि औषध निर्मिती घटकांच्या निर्यातीवर असलेले निर्बंध उठवले आहेत. मात्र, यामध्ये कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या हायड्रोक्लोरोक्वीन आणि पॅरासिटमॉल या औषधांवरील निर्बंध अजूनही कायम आहेत. देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतरच या औषधांची निर्यात करण्यात येईल. त्यासाठी औषध कंपन्या आणि परराष्ट्र मंत्रालय देशातील कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा करून निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.