नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे पोस्टर्स उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांचे हे पोस्टर्स त्यांचं स्वागत करण्यासाठी लावण्यात आलेले नाहीयेत किंवा त्यांनी केलेल्या कामासंदर्भात नाहीयेत तर वेगळ्याच कारणासाठी लावण्यात आलेत. होय, अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.


अमेठी लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राहुल गांधींना शोधून आणणा-याला बक्षीस देण्यात येईल असेही या पोस्टर्समध्ये म्हटलं आहे.


पोस्टर्समध्ये नेमकं काय आहे?


“माननीय, खासदार राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता झाले आहेत. लोकसभा मतदारसंघातील विकासकामे त्यांच्या कार्यकाळात ठप्प झाली आहेत. राहुल गांधींच्या या व्यवहारामुळे अमेठीच्या जनतेची फसवणूक झाली आहे आणि त्यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची माहिती देणा-यास बक्षीस देण्यात येईल” असा मजकूर या पोस्टर्समध्ये छापण्यात आला आहे.


दरम्यान, राहुल गांधी हे गेल्या सहा महिन्यांपासून अमेठी लोकसभा मतदारसंघात आलेले नाहीयेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी राहुल गांधी अमेठीत आले होते असेही म्हटले जात आहे.


या सर्व प्रकारावर अमेठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, राहुल गांधी प्रत्येकवेळी अमेठीत येऊ शकत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची बदनामी करण्यासाठी हे सर्व काही केलं आहे.