राजस्थान : मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला असला तरी राजस्थानचा मुख्यमंत्री कोण ? यासंदर्भात अद्यापही निर्णय लागलेला नाही. राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना पसंती दर्शविली तर सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांना पाठिंबा दिला आहे. अशोक गहलोत यांना रात्री विमानतळावरून पुन्हा राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलं. त्यानंतर बैठक झाली. सचिन पायलट रात्री उशीरा राहुल गांधी यांच्या घरातून बाहेर पडले परंतू त्यांनी गाडीची काचही खाली घेतली नाही. त्यावरून पायलट नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.


आज पुन्हा बैठक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक गहलोत दोन वेळा मुख्यमंत्री राहिले असून ७० पेक्षा जास्त आमदारांनी गहलोत यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गहलोत यांचे पारडे जड असले तरी सचिन पायलट यांनीही आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे.


आज सकाळी १० वाजता पुन्हा एकदा राहुल गांधी याच्या घरी बैठक होणार आहे. त्यात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होईल.


पायलट समर्थक आक्रमक 


राजस्थानमधील अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मोठी चुरस निर्माण झालेय. दरम्यान, सचिन पायलट यांचे समर्थक इंद्रमोहन सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री बनविण्यास विलंब झाल्यामुळे इंद्रमोहन यांनी हे पाऊल उचलले आहे.


इंद्रमोहन सिंग हे राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आहेत. सचिन पायलट यांच्या घराबाहेर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पायलट, गेहलोत यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.