`भविष्यवाणी खरी ठरली`; केंद्रीय मंत्र्यानी शेअर केला राहुल गांधींचा Moye Moye व्हिडिओ
Assembly Elections Result 2023 : काँग्रेसच्या पराभवानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. गोयल यांनी राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
Assembly Elections Result 2023 : देशातल्या चार महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 3 राज्यात भाजपने (BJP) सत्ता काबीज केली आहे. तर काँग्रेस (Congress) केवळ तेलंगणामध्ये सत्तेत आली आहे. राजस्थान आणि छत्तीगडमध्ये असलेली सत्ता काँग्रेसने हातातून गमावली आहे. या विजयानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनीसुद्धा राहुल गांधींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीमध्ये ते राज्यातून काँग्रेसची सत्ता जाण्याबद्दल बोलत होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पीयूष गोयल यांनी हा शेअर केला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागलं. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आधीच काँग्रेसचे सरकार होते. या पराभवानंतर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जात आहे. पराभवाचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाजप समर्थक जुने व्हिडिओ शेअर करून कॉंग्रेसवर टीका करत आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही राहुल गांधींची जुना व्हिडीओ शेअर करत त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याचे म्हटलं आहे.
पियुष गोयल यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांच्याच पक्षाचे सरकार पडल्याबद्दल ते बोलत होते. 'राहुल जीची भविष्यवाणी खरी ठरली', असे कॅप्शन गोयल यांनी या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये शेवटी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले 'मोये मोये' हे गाणं देखील वापरलं आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये भाजपाने 199 जागांपैकी 115 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 69 जागा जिंकता आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपाने 56 आणि काँग्रेसने 35 जागा जिंकल्या आहेत. मध्य प्रदेशात भाजपाने 163 तर काँग्रेसने 66 जागा मिळवल्या आहेत. तेलंगणामध्ये काँग्रेसला 64 जागा मिळाल्या आहेत.