काँग्रेस कार्यकारिणी समितीने राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर नवी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर नवी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. पण काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव एकमताने फेटाळून लावला. काँग्रेसला राहुल गांधींच्या नेतृत्वाची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधीच काँग्रेसचं नेतृत्व करू शकतात, असं सांगत राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेसने फेटाळून लावला.
राहुल गांधी यांनी चांगलं काम केल्याची काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची भावना आहे. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी राहुल गांधीच पार पाडू शकतात, असं वक्तव्य गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत केलं.
या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. यासाठीची योजना लवकरच अमलात आणली जाईल, असं काँग्रेस प्रवक्ते रणजीत सुरजेवाला म्हणाले. काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून दूर राहून सुद्धा संघर्ष करीत राहण्याची इच्छा राहुल गांधींनी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली होती.
दरम्यान महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला फक्त एका जागेवरच जिंकता आलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. महाराष्ट्रात झालेल्या काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वीकरलीय. तसंच प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. अनेक नेत्यांवर कारवाई करण्याची वेळ आल्याचं सांगत त्याबाबत अहवाल पाठवला असल्याचंही त्यांनी सांगितलं.