मोदींकडे पोलीस-आर्मी आहे तर माझ्याकडे सत्य आहे- राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
वलसाड : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात झाली आहे. गुजरात दौऱ्यात एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
मोदीजींकडे पोलीस, आर्मी आणि सरकार आहे तर आमच्याकडे केवळ सत्यता आहे असं म्हणत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.
वलसाड जिल्ह्यातील नाना पोन्धा येथे आयोजित सभेत राहुल गांधी यांनी म्हटलं की, "मोदीजींकडे पोलीस आणि आर्मी आहे. गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोव्याचं सरकार आहे. तर, आमच्याकडे केवळ सत्य आहे आणि इतर काहीही नाहीये. खोटं बोलणाऱ्याचा कधीच विजय होत नाही, नेहमी खरं बोलणाराच विजयी होतो".
राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातली रायबरेलीमध्ये झालेल्या एनटीपीसी दुर्घटनेतील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत थेट गुजरातमध्ये दाखल झाले. गुजरातमधील १८२ विधानसभा मतदारसंघात दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. पहिला टप्पा ९ डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी १४ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे.
गुजरातमध्ये भाजपची सत्ता दूर करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेस नवसर्जन यात्रा करत आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दक्षिण गुजरातमधील आदिवासींची मोठ्या प्रमाणात संख्या असलेल्या गावांचा दौरा करत आहेत.