ट्रम्प यांच्यासोबतचा संवाद मोदींनी देशाला सांगावा - राहुल गांधी
बैठकीत काय झालं ते सांगण्याची राहुल गांधींची मागणी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीराबाबत केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्रप्म यांच्या वक्तव्यावर राहुल गांधीनी ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी, ट्रम्प यांच्यासोबतचा संवाद मोदींनी देशाला सांगावा अशी मागणी केली आहे.
'राष्ट्रपती ट्रम्प यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी त्यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर मध्यस्थतेबद्दल सांगितले. जर हे विधान सत्य आहे तर पंतप्रधानांनी भारताचे हित आणि १९७२ च्या शिमला करारासोबत विश्वासघात केला असल्याचं' राहुल गांधींनी म्हटलं आहे.
'पंतप्रधानांनी भारताला पंतप्रधान आणि ट्रम्प यांच्या बैठकीत काय झालं याबाबत सांगावे' असं म्हणत पंतप्रधानांनी देशाला स्पष्टीकरण देण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
काश्मीरप्रश्नी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे मध्यस्थीची विनंती केली होती असा खळबळजनक दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यावर राहुल गांधींनी मोदींकडे याबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.