Rahul Gandhi on Union Budget : हिंदू धर्म आणि पुराणातील दाखले देऊन लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार पलटवार केला. अर्थसंकल्पावरील चर्चेत भाषण करताना राहुल गांधींनी लोकसभेत चक्क महाभारतातली गोष्ट ऐकवली. ही कहाणी होती चक्रव्युहात अडकलेल्या अर्जूनपुत्र अभिमन्यूची... आता 21 व्या शतकात नव्या चक्रव्युहात कुणी कुणाला अडकवलंय, हे देखील राहुल गांधींनी भाषणात तपशीलवार सांगितलं. त्यामुळे संसदेत भाजपच्या खासदारांनी राडा घातल्याचं पहायला मिळालं. 


राहुल गांधींचा 'चक्रव्यूह', संसदेत 'महाभारत' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्रव्यूह म्हणजेच पद्म व्यूह.. चक्रव्यूहाची रचना कमळासारखी असते. 21 व्या शतकात नवा चक्रव्यूह तयार करून देशाच्या जनतेचा अभिमन्यू करण्यात आलाय. हा चक्रव्यूह देखील कमळ रुपात आहे, पंतप्रधान मोदी ते चिन्ह छातीवर लावून फिरतात. महाभारतात कुरुक्षेत्रावर चक्रव्युहात घुसलेल्या अभिमन्यूला कौरव सेनेतल्या 6 जणांनी ठार मारलं. आता नवा चक्रव्यूह मोदी, शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी नियंत्रित करत आहेत, अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली.


राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. सत्ताधारी खासदारांनी आक्षेप घेत गोंधळ सुरू केला. तेव्हा सभागृहात उपस्थित नसलेल्या लोकांवर टीकाटिप्पणी करता येणार नाही, अशा शब्दांत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना समज दिली.


राहुल गांधींनी नव्या लोकसभेत पहिल्यांदा भाषण करताना भगवान शिवशंकराचा फोटो दाखवला होता. सर्व धर्मांमध्ये निर्भय मुद्राचा उल्लेख असल्याचं सांगून डरो मत असा संदेश दिला होता. आता बजेटवरच्या भाषणात त्यांनी चक्क महाभारतातील चक्रव्युहाची कहाणी सांगितली. हिंदू धर्म आणि पुराणातील गोष्टींचे दाखले देऊन भाजप सरकारला नामोहरम करण्याची नवी रणनीती राहुल गांधींनी आखलेली दिसतेय.