Rahul Gandhi Speech In Loksabha : लोकसभेच्या यंदाच्या सत्रामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावानंतर संसदेत एक आवाज निनादला आणि तो होता राहुल गांधी यांचा. विरोधी पक्षनेतेपदी असणाऱ्या राहुल गांधी यांनी आपल्या फळीच्या वतीनं लोकसभेच्या सभागृहात पहिलं भाषण दिलं. यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान संसदेत एकच गदारोळ पाहायला मिळाला. जवळपास 90  मिनिटांहून अधिकच्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी अनेक लक्षवेधी वक्तव्य केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनीसुद्धा नाराजीचा तीव्र सूर आळवला आणि संसदीय कामकाजात निर्माण झालेल्या या गोंधळाला अनुसरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सभापतींकडे सदरील भाषणाबाबत तक्रार केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांच्या भाषणामुळं झालेल्या गदारोळानंतर अखेर सभापती ओम बिर्ला यांनी तातडीनं कारवाईची पावलं उचलत त्यांच्या भाषणातील अनेक मुद्द्यांवर कात्री चालवली. संसदीय कार्यवाहीतून राहुल गांधी यांच्या भाषणाचा बराच भाग हटवण्यात आला आणि विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांकडून हा पहिला धक्का मिळाला. 


हेसुद्धा वाचा : डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणार


इथं राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावरून केलेल्या वक्तव्यामुळं मोठं वादंग माजलेलं असतानाच तिथं राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते असणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान समाजात तेढ निर्माण करणारं भाषण केल्याचा गंभीर आरोप केला. दोन्ही सदनांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर हा गोंधळ झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या भाषणातून मोठा भाग हटवण्यात आला. 


नेमकं कुठे बिनसलं? 


लोकसभेत सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पदाच्या जबाबदारीनं पहिलं संबोधनपर भाषण केलं. यावेळी त्यांनी हातता शंकराचं छायाचित्र घेत 'भगवान शंकर म्हणतात, घाबरू नका आणि घाबरवू नका'. यावेळी त्यांनी हिंदू धर्मापासून ख्रिस्त धर्मापर्यंतचे संदर्भ देत आपल्या वक्तव्याला आधार दिल्याचं पाहायला मिळालं. 


राहुल गांधी यांनी मोदींचा उल्लेख करत म्हटलं, 'मोदींनी त्यांच्या भाषणात एक दिवस म्हटलेलं, हिंदुस्तानानं कधी कोणावर हल्ला केला नाही. हा अहिंसेचा देश आहे. हा देश घाबरत नाही. किंबहुना आपल्या महापुरुषांनीही घाबरू नका आणि घाबरवू नका असा संदेश दिला. पण, दुसरीकडे मात्र जी माणसं स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात ते मात्र 24 तास हिंसा- हिंसा- हिंसा, द्वेष- द्वेष-द्वेष करतात.... तुम्ही हिंदू नाही आहात. हिंदू धर्मात स्पष्टपणे लिहिण्याकत आलं आहे की कायम सत्याची साथ द्या'. 



राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावर पंतप्रधानांनी आक्षेप घेत हा गंभीर विषय असून, हिंदूंना हिंसर म्हणणं सपशेल चूक असल्याचा मुद्दा उलचून धरला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू समाज नव्हे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदू समुदाय नव्हे, नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू समुदाय नव्हे... इथं सगळे हिंदू आहेत', या वक्तव्यानंतर राहुल गांधी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यामध्येही शाब्दिक द्वंद्व छेडलं गेल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात एकद गरादोळ माजला आणि पुढं त्यांच्या भाषणातून काही मुद्दे हटवत सभापतींनी कारवाई केली. आता संसदेत या कारवाईचे नेमके काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.