भाजपच्या मतांवर डोळा ठेऊन राहुल गांधींचं `टेम्पल रन`
काँग्रेसनं नवी व्यूहरचना आखली आहे, त्यासाठी राहुल गांधींनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे.
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : भाजपच्या पारंपरिक व्होटबँकेवर डोळा ठेऊन काँग्रेसनं नवी व्यूहरचना आखली आहे, त्यासाठी राहुल गांधींनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. आज त्यांच्या दौ-याचा दुसरा टप्पा सुरु होतोय. 9 ते अकरा ऑक्टोबर या तीन दिवसात राहूल गांधी अनेक मंदिराना भेट देणार आहेत.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी सध्या टेम्पल रनचा खेळ सुरू केला आहे. मोबाईलवर नाही, तर प्रत्यक्षात, गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, हिंदू मतं जिंकण्यासाठी काँग्रेसनं ही खास रणनीती आखली आहे. राहुल गांधींच्या गुजरात दौ-याचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. या दौ-यात त्यांनी चक्क 5 मंदिरांना भेटी देऊन आशीर्वाद घेतले.
सौराष्ट्र द्वारकेच्या द्वारकाधीश मंदिरात भगवान कृष्णाचं दर्शन घेऊन त्यांनी दौ-याला सुरूवात केली.
चामुंडा माता मंदिराच्या १ हजार पाय-या राहुल गांधी १५ मिनिटात चढले. पटेल समुदायाचं श्रद्धास्थान असलेल्या कागवडच्या खोडलधाम मंदिरात ते गेले तेव्हा, जय सरदार, जय पाटीदार या घोषणेनं त्यांचं स्वागत झालं.
दलित - बौद्धांचं श्रद्धास्थान असलेल्या दासी जीवन मंदिरात त्यांनी स्थानिकांच्या समस्या समजून घेतल्या. जामनगरला नवरात्रीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या दौ-यात धार्मिक स्थळांसोबतच व्यापारी, विविध संघटना, शेतकरी आणि सामाजिक संस्थांच्या भेटीगाठीही त्यांनी घेतल्या. त्यांच्या रोड शो ला गर्दी झाल्यानं काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्यात.
राहुल गांधींचा दुसरा गुजरात दौरा ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान सुरू होणाराय. 500 किलो मीटरच्या या दुस-या दौ-यातही ते धार्मिक स्थळांना भेटी देणार आहेत. त्यावेळी
दिवाळीनंतर राहुल गांधींच्या दौ-याचा तिसरा टप्पा उत्तर गुजरातमधून सुरू होईल. त्यावेळी अंबाजी, बेचर्जी, ऊंजा या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. या भागात अल्पसंख्याक समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या टेम्पल रन खेळीमुळं भाजपच्या गोटात खळबळ माजलीय. काँग्रेसच्या या हिंदूप्रेमामुळं मतांचं विभाजन होईल, अशी चिंता भाजपला वाटतेय.
कट्टर हिंदू विरोधी असलेल्या काँग्रेसला आपली ओळख बदलायचीय. त्यासाठीच राहुल गांधींनी 'टेम्पल रन' सुरू केलाय. त्यांना पटेलांचीही साथ मिळतेय. आता मंदिरातल्या देवांचा आशीर्वाद काँग्रेसचा वनवास संपवणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
राहुल गांधी यांचे 'टेम्पल रन' ही काँग्रेसची लिटमस टेस्ट अाहे. यात किती यश मिळतं आणि किती हिंदू मते काँग्रेसकडे आकर्षित होतात, हे गुजरात निवडणूकीच्या निकालातून कळेल.