अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. याला कारण आहे राहुल गांधींची बदललेली शैली. राहुल गांधींची भाषणशैली आणि त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचं नेतृत्व अधिक भक्कम झाल्याचं जाणवतंय. दारूण पराभवापासून बदललेल्या प्रतिमेपर्यंतच्या प्रवासाचा हा रिपोर्ट....


काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी. काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि भविष्यातले काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार. मात्र यूपीएची सत्ता गेल्यापासून आणि मोदी पर्वाचा उदय झाल्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. 


पराभवामुळे काँग्रेसमध्ये मरगळ 


विरोधकांनी अर्थातच भाजपनं राहुल गांधींची टिंगल-टवाळी सुरू केली. सोशल मीडियावर राहुल गांधींबद्दल पप्पूपासून युवराजपर्यंत अशा शब्दांत त्यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला. त्यानंतर सततच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये मरगळ आली आणि राहुल गांधीही गलितगात्र झाल्यासारखे वाटायला लागले.


भविष्यात राहुल गांधीच काँग्रेसचं नेतृत्व करणार का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेश  विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांचा दारूण पराभव झाल्यामुळे राहुल गांधी आणखीनच बॅकफूटवर गेले. 


 राहुल गांधी यांनी जोरदार पुनरागमन केलं


राजकीय विश्लेषकांनी थेट त्यांच्या नेतृत्तावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र गुजरात विधानसभा निवणुकीत राहुल गांधी यांनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी आपल्या भाषणांमधून वक्तृत्वाची चुणूक दाखवली. 


गुजरात म्हणजे भाजपचा आणि नरेंद्र मोदींचा गड. गेल्या वीस वर्षांपासून हा गड मोदींनी भक्कमपणे सांभाळून ठेवलाय. त्यामुळेच की  काय गेल्या २० वर्षांपासून गुजरात विधानसभेच्या निवडणुका काँग्रेसनं तेवढ्या गांभिर्यानं घेतल्या नाहीत. मात्र यंदा हवा पालटली. 


राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केलंय


मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णयावर जोरदार घणाघात करत राहुल गांधींनी गुजरात काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केलंय. एवढंच नव्हे तर जातीय समीकरण जुळवत बेरजेचं राजकारण करून नेतृत्वगुणही दाखवून दिले आहेत. 


राहुल यांची मोदींना घरच्या मैदानात घ्यावी लागली दखल


आणि त्यामुळंच तीन वर्षांपासून दुर्लक्षित केलेल्या राहुल गांधींची मोदींना त्यांच्या घरच्या मैदानात दखल घेणं भाग पडलं. गुजरातमध्ये त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरलीय. 


गुजरातची जनता कुणला कौल देणार हे १८ डिसेंबरला ठरणार. मात्र गुजरातच्या रणसंग्रामामुळं राहुल गांधींची प्रतिमा बदलण्यास मोठी मदत झालीय. काँग्रेसला सत्ता मिळो ना मिळो, मात्र राहुल गांधींच्या नेतृत्व आणि वक्तृत्वाच्या गुणांमुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय एवढं नक्की.