म्हणून एसी डब्याच्या काचा काढून ट्रेन केली रवाना
भारतीय रेल्वेच्या व्यवस्थेची पून्हा एकदा पोलखोल झाल्याचं पहायला मिळालं आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या व्यवस्थेची पून्हा एकदा पोलखोल झाल्याचं पहायला मिळालं आहे.
झालं असं की, शुक्रवारी सूरतहून मुझफ्परपूरसाठी सूरत एक्सप्रेस रवाना झाली. मात्र, शनिवारी या ट्रेनचा एसी ग्वालियर येथे खराब झाला. उकाड्याने हैराण झालेल्या प्रवाशांनी याची तक्रार कोच अटेंडंटला केली. त्यानंतर आग्रामध्ये एसी ठिक करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं.
मात्र, ट्रेन लखनऊला पोहोचल्यानंतरही एसी ठिक न झाल्याने संतप्त रेल्वे प्रवाशांनी उत्तर प्रदेशातील चारबाग रेल्वे स्टेशनवर गोंधळ सुरु केला. रेल्वे प्रवाशांनी जवळपास दिड तास गोंधळ घातला.
प्रवाशांनी आरोप केला आहे की, ट्रेनने ४०० किमीपेक्षा अधिकचा टप्पा पार केल्यानंतरही एसी सुरु झाली नाही. प्रवाशांचा वाढता गोंधळ पाहता चारबाग स्टेशनवरील स्टेशन मॅनेजरने कोचच्या ४ काचा काढत ट्रेन रवाना केली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी थर्ड एसी आणि स्लीपरच्या भाडं परत करण्याची मागणी केली.
चारबाग रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी ट्रेनला दुसरा कोच लावण्याची मागणी केली. मात्र, एसी कोच उपलब्ध नसल्याने कोच बदली केला नाही. यानंतर दुसरा मार्ग नसल्याने स्टेशन मॅनेजरने मॅकेनिकल सुपरवायजरला बोलवत ट्रेनच्या ४ काच्या काढल्या. त्यानंतर ट्रेन रवाना झाली.