नवी दिल्ली : सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे. रेल्वेत सुरक्षाविषयक सुमारे १ लाख पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने ही जम्बो भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या १ लाख पदांपैकी तब्बल ४१ हजार रिक्त पदे गँगमनची आहेत.


गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्विकारून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा पदभार हाती घेतलेल्या पियुष गोयल यांनी ही जम्बो भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती एक वर्षाच्या कालावधीत केली जाणार आहे. गोयल यांनी एक लाख पदे भरण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलाय.


संसदीय समितीने केंद्र सरकारला एक अहवाल सादर केला होता. या अहवालात रेल्वेची सुरक्षाविषयक सव्वा लाख पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या अहवालानुसार, १ एप्रिल २०१६ पर्यंत रेल्वेत एकूण २ लाख १७ हजार ३६९ पदे रिक्त आहेत, यापैकी १ लाख २२ हजार ७६३ पदे सुरक्षाविषयक आहेत. या सुरक्षाविषयक पदांपैकी ४७ हजार अभियंत्यांची तर ४१ हजार गँगमनची आहेत.