Train Travel Insurance: रेल्वेकडून मिळतो 10 लाखांचा इन्शुरन्स; तिकिट बुक करताना फक्त `हे` एक काम करा
Railway Travel Insurance: तुम्हाला माहितीये का रेल्वेकडून तुम्हाला विमादेखील दिला जातो. हा विमा कसा घ्यायला हे जाणून घ्या.
Railway Travel Insurance: रेल्वे अपघातांच्या बातम्या तर तुमच्या कानावर आल्या असतीलच. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना ट्रेन तिकिटांवर 10 लाख रुपयांपर्यंतचा ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळतो. त्याचा फायदा कोणाला कसा होतो? हे जाणून घेऊया.
तिकिट बुक करताना काय काळजी घ्याल?
IRCTCकडून ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या सुविधा दिल्या जातात. यात ट्रॅव्हल इन्शुरन्सदेखील समाविष्ट आहे. मात्र या टॅव्हल इन्शुरन्सचा फायदा घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. ट्रेनने प्रवास करत असताना जर तुम्ही तिकिट बुक कराल तर तुम्हाला ट्रेन ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय दिसेल. तेव्हा तुम्हाला तिथे ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय निवडायचा आहे. या इन्सुशरन्सचा फायदा फक्त त्यांनाच होईल ज्यांनी ऑनलाइन तिकिट बुक केले आहे.
त्याचबरोबर PNRवर जितके पण तिकिट बुक केले आहेत. त्या सर्व प्रवाशांना याचा फायदा मिळणार आहे. पण जर तुमचं तिकिट कन्फर्म किंवा RAC असेल तरच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. तिकिट कन्फर्म नसेल तर तुम्ही इन्शोरन्ससाठी क्लेम करु शकणार नाहीत. ही गोष्ट प्रवाशांनी लक्षात ठेवावी.
दररोज भारतीय रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात. ट्रेनमध्ये अपघातही होतात. अशावेळी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकिट बुक करताना ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला असेल तर ते इन्शुरन्स क्लेम करु शकतात. जर तिकिट बुक करताना ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय निवडला नसेल तर तुम्ही इन्शुरन्ससाठी क्लेम करु शकत नाही. तसच, तिकिट ऑनलाइन बुक केलं असेल तरच तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सचा फायदा मिळणार आहे. ऑफलाइन तिकिट खरेदी करणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाहीये.
ट्रेन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेण्यासाठी तुम्हाला फक्त 45 पैसे खर्च करावे लागणार आहेत. फक्त 45 पैसे खर्च करुनही तुम्हाला 7 ते 10 लाखांपर्यंतचा इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे. प्रवासादरम्यान जर एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर रेल्वेकडून त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांपर्यतचा वीमा कव्हर देण्यात येतो. त्यामुळं तिकिट बुक करताना नॉमिनीचा तपशील काळजीपूर्वक भरावी लागेल.
तिकीट बुक करताना नॉमिनीचा तपशील भरताना, फक्त तुमचा मेल आयडी टाका. अनेक वेळा लोक एजंटकडून तिकीट बुक करतात, अशा परिस्थितीत तुम्ही एजंटला तुमचा नंबर आणि ई-मेल आयडी टाकण्यास सांगावे. असे केल्याने अपघात झाल्यास दावा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सचा लाभ घ्यायचा असेल, तर नॉमिनी किंवा लाभार्थी यांना अपघातानंतर ४ महिन्यांच्या आत त्यासाठी दावा करावा लागेल. तुम्ही ज्या कंपनीचा विमा घेतला आहे त्या कंपनीला तुम्हाला शक्य तितक्या लवकर सर्व तपशील द्यावे लागतील. क्लेम केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला विम्याचे पैसे मिळतील.
भारतीय रेल्वे आणि पर्यटन महामंडळाच्या वेबसाइटनुसार, प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाईल. प्रवासादरम्यान एखादा प्रवासी पूर्णपणे अपंग झाल्यास त्याला 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षणही दिले जाईल. याशिवाय अंशतः अपंगत्व आल्यास 7,50,000 रुपये आणि दुखापत झाल्यास 2 लाख रुपयांचा विमा दिला जातो. याशिवाय, प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्यास 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.