Weather News : देशातील अनेक भागात पावसाने (Monsoon) जोरदार हजेरी लावलेली आहे. सध्या देशातील 20 राज्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. हिमाचल, पंजाबसारख्या काही राज्यांमध्ये पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. गेल्या 15 वर्षांत दिल्लीत (Delhi) जुलैमध्ये एवढा पाऊस पडण्याची ही दुसरी वेळ आहे. दुसरीकडे 22 जुलैपासून तेलंगणामध्ये (Telangana Rain) पावसामुळे आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात पावसाची संततधार सुरू असून गुरुवारीही अधूनमधून पाऊस सुरूच होता. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून रस्ते आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र-तेलंगणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये 28 जुलै पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच दिल्लीत यमुनेचे पाणी पुन्हा एकदा धोक्याच्या पातळीवरून 205.83 वर पोहोचले आहे. हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, उत्तराखंडपासून ते तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेशपर्यंत मुसळधार पावसाचे कोसळत आहे. त्याचबरोबर देशातील 32 टक्के जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार मणिपूर, झारखंड आणि बिहार या जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 27 जुलै दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.


जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर झारखंड आणि मेघालयात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो.


दुसरीकडे, हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, शेजारील ठाणे, रायगडसह संपूर्ण राज्यात पाऊस पडत आहे. दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, गंगा, यमुना, घग्गर, हिंडनसह सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. नद्यांच्या प्रवाहाशेजारील अनेक भाग पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.