अयोध्या : राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी अयोध्येत शिवसैनिक आणि साधूसंत तसंच करसेवकांची गर्दी झालेली असताना अयोध्येत आता श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने याबाबतची घोषणा केलीय. अयोध्येत २२१ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. श्रीरामाचा हा पुतळा जगातील सगळ्यात उंच पुतळा असेल असं सांगण्यात येतंय. १५१ मीटर उंच मूर्ती, २० मीटर उंच छत्र आणि ५० मीटर उंच पाया असं या २२१ मीटर उंच पुतळ्याचं स्वरूप असेल.


शरयू नदीला साकडं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्मण किला इथं संकल्प पूजा केली. झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी आलोय असं सांगत न्यायालयाचा निर्णय येण्याआधी राममंदिरासाठी कायदा करा, शिवसेना पाठिंबा देईल, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी लक्ष्मण किल्ल्यावरुन केली. यानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या खासदारांनी हाती पंचारती घेऊन शरयून नदीची आरती केली आणि शरयू नदीला राममंदिरासाठी साकडं घातलं.


सरकारने अध्यादेश आणावा


'आशीर्वाद उत्सव'साठी अयोध्येत पोहोचलेल्या उद्धव ठाकरे यांनी नुकतेच रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत यावेळी पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील होते. दर्शन घेतल्यानंतर ते हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'अयोध्येमध्ये राम मंदिर होत, आहे आणि राहिलं पण दिसतं नाहीयं. अयोध्येत राम मंदिराचे निर्माण लवकरात लवकर व्हायला हवं. राम मंदिर बनविण्यासाठी सरकारला अध्यादेश आणायला हवा', असं ते म्हणाले.


'भावनांशी खेळू नका'


मंदिर वही बनायेंगे असं वारंवार म्हटलं जात पण बनवणार कधी ? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.  हिंदुत्व मार खाणार नाही किंवा शांतही बसणार नाही' असे सांगत हिंदुच्या भावनांशी खेळू नका असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला. शनिवारी उद्धव यांनी अयोध्येत संतांच्या भेटी घेतल्या. श्रीराम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना राम मंदिरासाठी चांदीची वीट भेट देखील दिली.


विहिंपची जय्यत तयारी 


रविवारी होणाऱ्या धर्मसभेसाठी विश्व हिंदू परिषदेचीही जय्यत तयारी सुरूय. या धर्मसभेसाठी ८० फूट लांब व्यासपीठ तयार आहे. या व्यासपीठावर जवळपास दीडशेहून अधिक साधू, संत आणि महंत विराजमान होणारयत. इथं येणाऱ्या रामभक्तांची संख्या दोन लाखांच्या आसपास असेल असा अंदाज विहिंपनं वर्तवलाय. त्यानुसार या धर्मसभा स्थळावर व्यवस्था करण्यात आलीय.