कुस्तीपटूंच्या आंदोलनाची राज ठाकरे यांनी घेतली दखल, थेट पंतप्रधानांना पत्र लिहित केली `ही` मागणी
Wrestlers Protest : गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची दिल्ली पोलिसांसोबत झटापट झाली होती.
Wrestlers Protest : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाईची मागणी करत गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटू दिल्लीतील आंदोलन करत आहेत. रविवारी(28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण झाल्यानंतर या आंदोलनाला वेगळं वळण लागलं आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना फरफटत नेत अटक करण्यात आल्याचे साऱ्या देशाने पाहिलं. मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. देशभरातून लोक यावर व्यक्त झाले होते. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) यांना पत्र लिहीत या प्रकरणात लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे.
ब्रृजभूषण यांना अटक करण्यासाठी भारतीय कुस्तीपटू एका महिन्याहून अधिक काळ दिल्लीत आंदोलन करत होते. रविवारी कुस्तीपटूंची धरपकड करत दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवरून हटवले आणि त्यांच्या आंदोलन स्थळावरुन सगळं सामान हटवलं. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले होते. मात्र काही कुस्तीपटूंवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे देशभरातून प्रतिक्रिया उमटत होत्या. यानंतर कुस्तीपटूंनी मंगळवारी आपली पदके गंगेमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र भारतीय किसान संघटनेने समजूत घातल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहीलं आहे. पंतप्रधानांनी स्वतः या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.
काय म्हटंलय पत्रात?
"आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता प्रधानसेवक ह्या नात्याने आपण याकडे लक्ष द्यावे ही विनंती. ज्यांचा गौरव आपण देश की बेटियॉं असा करत आलो आहोत ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा आणि या लढाईत कोणाच्याही बाहुबलाचं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे. ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेव्हा असो की मुंबईतील 26/11च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवासस्थानापासून काही किलोमीटरवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र निवनिर्माण सेनेची पण आहे," असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे