पत्नीने डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती संतापला, 3 वर्षांच्या चिमुरडीची जमिनीवर आपटून केली हत्या
आरोपीने पत्नीला आधी मारहाण केली, पण यानंतरही त्याचं मन भरलं नाही म्हणून त्यानं चिमुरडीवर काढला राग
राजस्थान : राजस्थानच्या अलवरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीने डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून संतापलेल्या पतीनं याचा राग 3 वर्षांच्या चिमुकलीवर काढला. पत्नीच्या मांडीवर झोपलेल्या मुलीला हिसकावून त्याने जमिनीवर आपटलं. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर या नराधमाने मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार ही केला.
पीडित पत्नीने आपल्या पतीविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अलवर मधील बहरोड पोलीसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीने डोक्यावर पदर घेत नसल्याने आरोपी प्रदीप यादव हा नाराज होता.
पत्नीचा राग मुलीवर काढला
याच गोष्टीवरुन आरोपी प्रदीप यादव आणि त्याच्या पत्नीत वाद झाला. यानंतर प्रदीप यादवने पत्नीला जबर मारहाण केली. पण यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. आपला राग त्याने 3 वर्षांच्या चिमुरडीवर काढला.