राजस्थानमध्ये मंडप कोसळून १७ जण ठार
राजस्थानमध्ये मंडप कोसळून १७ जण ठार झाले आहेत, तर ७० जण या दुर्घटनेत जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बारमेर : राजस्थानमध्ये मंडप कोसळून १७ जण ठार झाले आहेत, तर ७० जण या दुर्घटनेत जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजस्थानातील बारमेरमधली ही दुर्घटना आहे. बालोतरा येथे एका वस्तीवर रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. रामकथा ऐकण्यासाठी महिला आणि पुरुष भाविकांची गर्दी झाली होती. संध्याकाळच्या सुमाराच आलेले वादळी वारे आणि पावसापुढे हा मंडप तग धरू शकला नाही आणि भाविकांवर कोसळला.
या दुर्घटनेत विजेची तारही मंडपावर कोसळली. यात १४ भाविकांचा जागीच मृत्यू, तर ७० जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना खासगी वाहन आणि रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली.