राजस्थानच्या राजकारणात नवी रंगत; बसपाकडून काँग्रेसविरोधात मतदान करण्याचा व्हीप
गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडल्यास या सहा आमदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते.
जयपूर: सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानमध्ये सुरु झालेल्या राजकीय नाट्यात आणखी एक ट्विस्ट आला आहे. बहुजन समाज पार्टीने BSP रविवारी राजस्थानमधील आपल्या सहा आमदारांसाठी व्हीप जारी केला. यामध्ये गेहलोत सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यास काँग्रेसविरोधात मतदान करा, असे म्हटले आहे. या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या आमदारावर कारवाई करण्यात येईल व त्याचे विधानसभा सदस्यत्त्व रद्द होईल, असेही 'बसप'कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राजस्थानातल्या राजकारणाचे महाराष्ट्रात पडसाद, काँग्रेस राजभवनासमोर आंदोलन करणार
आर. गुढा, लाखन सिंह, दीपचंद, जेएस अवाना, संदीप कुमार आणि वाजिब अली अशी बसपाच्या सहा आमदारांची नावे आहेत. गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडल्यास या सहा आमदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. या पार्श्वभूमीवर बसपकडून हा व्हीप जारी करण्यात आला आहे.
याशिवाय, 'बसपा'कडून राज्यपाल कलराज मिश्र आणि विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनाही पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, बसपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याचे राज्य स्तरावर विलीनकरण करता येणार नाही. बसपाच्या सहा आमदारांनी पक्षाच्या निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आपल्याला आमदारांनी व्हीप जारी करण्याचा अधिकार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
दरम्यान राजस्थानमध्ये भाजपकडून सुरु असणाऱ्या फोडाफोडीच्या राजकारणाचा निषेध म्हणून आज मुंबईत राजभवनासमोर काँग्रेस नेत्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि आमदार सहभागी होणार आहेत.